प्रवाशांच्या गर्दीने फुलले बसस्थानक; उन्हाळी सुट्या संपल्याने बसेस हाऊसफुल्ल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : उन्हाळी सुटी संपून सोमवारपासून शाळा-महाविद्यालये सुरू होत असल्याने, रविवारी शहरातील मुख्य एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुट्या घालवून गावी गेलेले विद्यार्थी, पालक आणि नोकरदार वर्ग एकाच वेळी शहराकडे परतत असल्याने मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकांवरील अनेक गाड्या हाऊसफुल्ल धावत होत्या.
यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच रविवारी शहरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आलेल्या उमेदवारांचीही बसस्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच वैजापूर, कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूर, फुलंब्री, खुलताबाद आणि सोयगाव मार्गावरील बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. दोन्ही प्रमुख बसस्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने काही मार्गांवर अतिरिक्त फेर्‍यांचे नियोजन केले, मात्र तरीही दिवसभर एसटीच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण जाणवत होता. आणखी काही दिवस गर्दी राहण्याची शक्यता आहे.